Pre-Booking - Vedya Mansanchya Shahanya Goshti
Pre-Booking
वेडाचा शोध घ्यायचा, माणूस वेडा का होतो याच्या कारणांशी जाण्याचा प्रयत्न करायचा हा या पुस्तकाचा उद्देश होता. तो किती सफल झाला हे वाचक ठरवतीलच; पण माणसं वेडी का होतात, हे स्वत:च्या अनुभवातून सांगण्याची प्रज्ञा आणि त्यासाठी अविरत बांधिलकीचं समर्पण माझ्यात रुजवणारं हे पुस्तक आहे. मी मनोरुग्णालयांच्या परिघात पाऊल ठेवलं, तेव्हाच मला भेटलेला प्रत्येक रुग्ण ‘मला तुझी सहानुभूती नकोय, तर तुलाच आमच्या सहानुभूतीची गरज आहे’ असं जणू सांगू लागला. प्रत्येक रुग्ण!
या पुस्तकाच्या कामादरम्यान माझा जवळपास दोनेकशे रुग्णांशी संबंध आला. पन्नास जण माझ्याशी मोकळेपणानं बोलले. त्यांच्यातले पंधरा-वीस तर सुसंगत मांडण्याइतपत बोलले. या पंधरा-विसांसह उरलेल्या शेकडो रुग्णांतील प्रत्येकाच्या कथेचे धागे येनकेनप्रकारेण माझ्याशी काहीना काही नातं सांगू लागले. त्यांच्या शहाण्याच्या जगातून निवृत्तीचा काळ तर अत्यंत बीभत्सरसाचा परिपोष होता. ‘त्याच निवृत्तीच्या काळातून तू तर जात नाहीस ना’ असा संभ्रम त्यांनी सुरुवातीलाच माझ्या मनात निर्माण केला. त्यातील तथ्य माझ्यापातळीवर मी शोधू लागलो. या लेखनाला साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक मूल्य किती असेल, यापेक्षाही असंगतीतून आकाराला आलेला एखादा तरी तंतू या विषयाला संगतवार मांडण्यासाठी कधी तरी, कुणाला तरी उपयुक्त ठरेल, अशी खात्री वाटते.