Educated
स्वत:च्याच निक्कम्मेपणाचं भय वाटणं म्हणजे अपराधभाव.
त्याचा इतर लोकांशी काही संबंध नसतो. त्यामुळे सूडभावनेतून
अपराधभाव कमी होत नाही.
हे मला उमगलं आणि माझा निर्णय मी फक्त माझा म्हणून स्वीकारला.
जुन्या तक्रारी सतत उगाळत न राहता, वडिलांच्या चुका माझ्या
चुकांशी तोलत न राहाता, मला हवा होता म्हणून मी तो निर्णय घेतला.
असं जेव्हा मला स्वीकारता आलं तेव्हा माझा अपराधभाव गळून गेला.
कारण माझ्या वडिलांचा विचारही न करता, मी माझा निर्णय माझ्या
स्वत:साठी घेतला होता, असं मान्य करायला मी शिकले.
अर्थात मी बदलले आहे असं कितीही वाटलं, माझं शिक्षण कितीही
कौतुकास्पद असलं आणि मी अगदी वेगळी दिसायला लागले होते
तरीही मी तीच होते. फार तर, माझ्यात दोघीजणी लपल्या होत्या असं
म्हणता येईल, एक दुभंगलेलं मन होतं. ती आतमध्ये असायची,
आणि जेव्हा कधी मी माझ्या वडिलांच्या घराचा उंबरा ओलांडायची
तेव्हा ती वर यायची.
त्या रात्री मी तिला हाक मारली आणि तिनं उत्तर दिलं नाही.
ती मला सोडून गेली. ती आरशातच थांबली. त्या क्षणानंतर मी जे जे
निर्णय घेतले ते निर्णय माझे होते, तिनं जसे निर्णय घेतले असते तसे
ते नव्हते. ती निवड एका बदललेल्या व्यक्तीची होती, नव्या व्यक्तिमत्वाची होती.
या ‘स्व'भानाला तुम्ही काहीही म्हणू शकता. आमूलाग्र बदल. रुपांतर. खोटेपणा.
विवासघात. मी त्याला शिक्षण म्हणते. त्याचीच ही गोष्ट.
Educated | Tara Westover and Translated By : Vandana Bhagavat
एज्युकेटेड | तारा वेस्टोव्हर आणि अनुवाद : वंदना भागवत