Kapuskondyachi Goshta
पश्चिम विदर्भाची
‘कापसाचा प्रदेश’ ही ओळख खरी नाही; ब्रिटिशांच्या वसाहतवादी नफेखोर धोरणाने
निर्माण झालेली आहे. ब्रिटिश येण्याआधी गवताळ माळरानं, स्थानिक लोकसमुदायांनी
जोपासलेले शेतीपूरक पशुधन, वातावरणाचा विचार करून निवडलेली पिकपद्धती, योग्य
पाणी-व्यवस्थापन आणि वनांचे अस्तित्व याबाबत वर्हाड समृद्ध होता.
या भागातल्या निसर्ग,
भूगोल, वातावरण या घटकांच्या अनुभवाधारीत समजुतदारपणाच्या आणि प्रयोगांच्या
भरवशावर स्थानिकांनी एक परस्परावलंबनाची व्यवस्था निर्माण केली. पेन्सिल्वेनिया
विद्यापीठात इतिहासाचे प्राध्यापक असणार्या डॉ. लक्ष्मण सत्या यांनी या पुस्तकात
उपलब्ध माहितीसंग्रहाच्या आधारे ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणांमागची प्रेरणा,
त्यांची अंमलबजावणी आणि स्थानिक लोकजीवन, निसर्ग आणि पशुधन यांच्यावर झालेले
विपरीत परिणाम यांची अव्यक्त कथाच वाचकांसमोर ठेवली आहे.
शेतकरी, अभ्यासक, पत्रकार,
निसर्गप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी आणि शिक्षक अशा सर्वांसाठीच हा
वसाहतकालीन धोरणांचा लेखाजोखा महत्त्वाचा तर आहेच, परंतु आजच्या समस्यांबाबत
दिशादर्शकही आहे.