Shabdarutu
लक्ष्मीकांत तांबोळी यांनी कविता, कथा, कादंबरी, ललितगद्य, समीक्षा
या प्रकरांत मौलिक असे लेखन केले. सहा दशकातील त्यांच्या वाड्मयनिर्मितीत
बहुविधता आहे. 'हुंकार' ते 'जन्मझुला' या सहा कवितासंग्रहांत त्यांची कविता
विसावलेली आहे. या कविताप्रवासात विविध वळणे आहेत. 'चांदण्याची गोड
व्यथा आज माझ्या उरी' ते 'चांदण्याने केला उन्हाशी शेजार, आता सावलीला
उरले ना घर.' आकाशफांदीवरून कोसळला स्वप्नांचा झुला' या भावरूपाची
ही कविता आहे, 'गोकुळवाटा 'मधील कवितेत त्यांनी राधाकृष्णाच्या
प्रीतभावनेची सुफळ चित्रे रेखाटली. पुढे ही कविता 'दयाळा एवढे द्यावे'
अशा प्रार्थनारूपात विसर्जित झाली. त्यांनी लिहिलेले 'मराठवाडा गीत'
सर्वदूर पोहोचले. भावकविता, सामाजिक कविता आणि चिंतनशील कविता
असे तिचे स्वरूप आहे. कथनात्मक साहित्यात 'दूर गेलेले घर', 'कृष्णकमळ',
'अंबा' व 'गंधकाली' या कादंबऱ्यांतून त्यांनी समकालीन तसेच पौराणिक जीवनाचे
चित्रण केले. ग्रामीण भागातील ब्राह्मण कुटुंबाची पडझड, व्यक्तिजीवनाच्या
शोकान्तकथा, पूर्वजशोध ते गाव स्थलांतरणाचे संदर्भ त्यांच्या कादंबरी वाड्.मयास
आहेत.
महाभारताच्या चिवट अशा कथाकर्षणापोटी त्यांनी सत्यवती आणि अंबाच्या
जीवितकथांचा शोध घेतला; तर आत्मपरता, वाड्.मयीन जडणघडणीची रूपे,
वेधक व्यक्तिचित्रणे, समाजभूगोल परिसरचित्रे व चिंतनशीलता ही त्यांच्या
ललितगद्याची वैशिष्ट्ये होत. तांबोळी यांच्या निवडक वाड्.मयातील शब्दऋतूंचे
हे सोहळे वाचकांना समृद्ध करतील. 'दयाळा एवढे द्यावे, फुलांचे रंग ना जावे /
उडाया पाखरांसाठी, जरा आभाळ ठेवावे / चालता तिमिरवाटेने, सोबती चांदणे
यावे' अशा भावनेचे हे शुभंकर साहित्य जुन्या नव्या वाचकांना निश्चित भावेल,
असा विश्वास वाटतो.
Shabdarutu : Nivdak Laxmikant Tamboli | Sampadan : Randhir Shinde
शब्दऋतू : निवडक लक्ष्मीकांत तांबोळी । संपादन : रणधीर शिंदे
