Samas
डॉ. अमर्त्य सेन यांनी भारतीयांचे वर्णन ‘वाद-संवादप्रिय’असे केले आहे. विविध
परस्पर-विरोधी विचारप्रवाह आणि निकोप वादविवाद यासाठी महाराष्ट्राची भूमी
प्राचीन काळापासून अनुकूल राहिली आहे. मध्ययुगात उदयास आलेले विविध
उदारमतवादी भक्तिसंप्रदाय असोत की आधुनिक काळातील विवेकनिष्ठ
प्रबोधनाच्या चळवळी असोत, या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. देशातील
उभे राहिलेले समाज परिवर्तनाचे लढे असोत की स्वातंत्र्यासाठी झालेले राष्ट्रीय
आंदोलन असो, त्यासाठी वैचारिक रसद आणि ऊर्जा महाराष्ट्राने पुरवली आहे, हा
अगदी अलीकडचा इतिहास आहे. मराठीतील प्राचीन आणि अर्वाचीन साहित्य हा
त्याचा पुरावा आहे.
तेराव्या शतकापासूनचे मराठीतील उदारमतवादाची शिकवण देणारे संतकाव्य,
विवेकनिष्ठेचे अधिष्ठान असलेले निबंध वाङ्मय, संवेदना आणि सौंदर्याचे दर्शन
घडवणारे गद्य-पद्य ललित साहित्य आणि तर्कशुद्ध-बुद्धिप्रामाण्यवादी मशागत
करणारे वैचारिक साहित्य, हे त्या-त्या काळातील महाराष्ट्राच्या बदलत्या
विचारविश्वाचे दर्शन घडवणारे साहित्य आहे.
‘समास’ या ग्रंथात साहित्याच्या रूपाने गतकाळातील परिवर्तनाची परंपरा जशी
दिसते, तशी भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी आवश्यक अशी प्रेरणाही दिसते.
वर्तमान मराठी जनमानस चैतन्यशील, सर्जनशील आणि कृतिशील व्हावे यासाठी
मराठीतील मौलिक व प्रातिनिधिक साहित्याचे हे संपादन केले आहे. अनेक भारतीय
भाषांमध्ये राबवल्या जात असलेल्या ‘दक्षिणायन भारतीय विचारमाले’चा हा
मराठी खंड आहे.
Samas | Editor : Dr. Pramod Munghate and Dr. Ganesh Devi
समास : डॉ. प्रमोद मुनघाटे । मालिका संपादन : डॉ. गणेश देवी