Gandhi Jagleli Mansa
गांधी नावाच्या माणसाचा एक वेगळा विचार आहे आणि तो अचंबित करणारा आहे.
गांधींनी सुरू केलेल्या वैचारिक चळवळीत खूप माणसं घडली. त्यातील जवळपास
सर्वच स्वातंत्र्य चळवळीत होती. त्यातील काही विधायक कार्यातदेखील होती. पैकी
कोणी भूदान चळवळीत आपलं योगदान दिलं, कोणी निसर्गोपचार केंद्र सुरू केले,
कोणी शौचालयावर संशोधन तर कोणी कुष्ठरोग निवारण्यासाठी झटत राहिली, कोणी
‘नयी तालीम शिक्षण प्रणाली` राबविली. अशी कित्येक माणसं बिनतक्रार आयुष्यभर
एकीकडे त्यांची कामं, दुसरीकडे गांधींचा वैचारिक वारसा पुढे न्यायचं काम करीत
राहिली. अशा अनेक माणसांच्या सोबत मला राहायला मिळाले. त्यांच्या आचार-विचारातून
मला बापू कळले. त्यांच्या या काही सहकाऱ्यांच्या माध्यमातून, गांधी विचाराबद्दल
आणि त्यांच्या कृतीबद्दल ऐकायला, शिकायला मिळाले. त्यातील काहींना प्रसिद्धी
मिळाली परंतु काही प्रकाशझोतापासून फार दूर राहिले. त्यांना आजच्या पिढीसमोर,
वाचकांसमोर ठेवण्याचा माझा संकल्प आज मी पूर्ण केला. ‘निर्मोही` असणे ही
बाब समाज हितासाठी किती आवश्यक आहे हे त्यांच्यामुळेच मला कळाले.
पडत्या पावलांना समाजभानाची ओळख पटवून देण्यासाठी अविरत चिंता
आणि चिंतन यातून ‘गांधी जगलेली माणसं` समजत गेली. माझ्या क्षमतेनुसार
जेवढी ती मला उमगली, समजली तेवढी या पुस्तक स्वरूपात ती आपणा समोर
ठेवत आहे. त्यांच्या विषयी सध्याच्या वर्तमानात प्रसिद्ध होणे हे मला गरजेचे वाटले.
म्हणूनच हा लेखनप्रपंच!
गांधी जगलेली माणसं । इंदुमती जोंधळे
Gandhi Jagleli Mansa | Indumati Jondhale