Noaakhali

-20% Noaakhali

आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या भीषण दंग्यांची जेव्हा चर्चा होते तेव्हा नोआखालीचे नाव आवर्जून घेतले जाते. 16 ऑगस्ट 1946 रोजी मुस्लीम लीगने पुकारलेल्या प्रत्यक्ष कृती दिनाच्या निमित्ताने कोलकाता येथे भीषण सांप्रदायिक दंगे भडकले. त्याची धग कोलकातापासून 400 किलोमीटर दूर असलेल्या आजच्या बांग्लादेशमधील नोआखाली जिल्ह्यापर्यंत जाऊन पोहोचली. तेव्हा नोआखालीतील अल्पसंख्य हिंदूंचे अश्रू पुसण्यासाठी, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शहात्तर वर्षांचे वयोवृद्ध गांधीजी तेथे चार महिने जाऊन राहिले. हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता. मानवाच्या इतिहासात सत आणि असत शक्तींमधे अखंड चाललेल्या संघर्षात चिरंतन सत मूल्यांच्या रक्षणासाठी गांधीजींचे नोआखालीत जाऊन राहणे यास फार मोठे महत्त्व आहे. किंबहुना आज आपला समाज स्वातंत्रोत्तर काळातील सर्वात कठीण आव्हानाला सामोरा जात असताना हे महत्त्व आणखी वाढते. कारण सांप्रदायिकतेच्या समस्येने आज अत्यंत उग्र रुप धारण केले असून पुन्हा एकदा मानवतेच्या अस्तित्वापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अशा पार्श्वभूमीवर हिमालयाएवढ्या आव्हानाचा सामना करत गांधीजींनी मानवाच्या असीम आत्मबलाचा अत्युच्च मानबिंदू नोआखालीतून कसा प्रस्थापित केला, याची ही कहाणी रमेश ओझा आणि श्याम पाखरे या लेखक द्वयींनी आपल्यासमोर मांडली आहे. आजच्या अत्यंत निराशाजनक परिस्थितीत नोआखाली पर्वाचे स्मरण करून देणारी ही कादंबरी वाचकांना मानवतेच्या रक्षणासाठी नवी प्रेरणा देईल अशी आशा आहे.

नोआखाली | रमेश ओझा, श्याम पाखरे
Noaakhali| Ramesh Oza And Shyam Pakhare

noakhali

लोकसत्ता वृत्तपत्रात आलेले परीक्षण

माणुसकीच्या अविरत लढ्याची गोष्ट
इतिहासातील घटनांशी प्रामाणिक राहत, त्यात फेरफार न करता कथानक रचणे सोपे काम नाही. लेखकद्वयींनी हे भान सांभाळत ही कादंबरी लिहिली आहे. नोआखालीतील गांधीजींचे वास्तव्य हे कादंबरीचे कथानक आहे.
-निशा शिवूरकर
रमेश ओझा आणि श्याम पाखरे यांनी लिहिलेली ‘नोआखाली : माणुसकीचा अविरत लढा’ हे पुस्तक कादंबरी लिखाणाचा वेगळाच प्रयोग आहे. देशाच्या नजीकच्या इतिहासात घडलेल्या एका नाजूक पर्वाचा लेखाजोखा या कादंबरीत आहे. इतिहासातील घटनांशी प्रामाणिक राहत, त्यात फेरफार न करता कथानक रचणे सोपे काम नाही. लेखकद्वयींनी हे भान सांभाळत ही कादंबरी लिहिली आहे. नोआखालीतील गांधीजींचे वास्तव्य हे कादंबरीचे कथानक आहे. या कथानकात तत्कालीन राजकीय, सामाजिक वास्तव लेखकांनी अंर्तभूत केले आहे. कथानक केवळ घटनांची मालिका राहत नाही, तर त्या काळातील जनतेच्या मनातील आंदोलनांचा आरसा ठरते.
गांधीजींच्या जीवनातील अंतिम काळातील घटना हा कादंबरीचा विषय आहे. फाळणीपूर्व हिंसाचाराने व्यथित झालेले गांधीजी शांततेच्या मार्गाने हिंसा थांबविण्यासाठी निवडक सहकाऱ्यांसह सध्याच्या बांग्लादेशातील नोआखालीतील अल्पसंख्य हिंदूंचे अश्रू पुसण्यासाठी, त्यांच्यात विश्वास निर्माण करण्यासाठी येतात. चार महिन्यांच्या काळातील वृद्ध गांधीजींची पदयात्रा ‘कबीर’ या रेव्हील्युशनरी सोशालिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्याच्या नजरेतून वाचकांसमोर लेखकांनी उभी केली आहे. कादंबरीची दृश्यात्मकता वैशिष्ट्यपूर्ण आहे. वाचकही या पदयात्रेत चालायला लागतो. त्यांच्याही डोळ्यात आसवे येतात. काहीशा गोंधळलेल्या कबीरला गांधीजींचा शोध घ्यायचा आहे. त्याच्या मनात अनेक प्रश्न आहेत. वाचकांच्या मनातही गांधीजींविषयी कुतूहल व प्रश्न आहेत. कबीरच्या या शोधात वाचकही सहभागी होतात.
कादंबरीचा नायक महात्मा गांधी आणि कबीरही आहे. कलकत्त्यात राहणारा कबीर १९७१ च्या ऑगस्ट महिन्यातील एका सकाळी स्टेटसमन वर्तमानपत्रातील ‘नोआखालीतील जोयाग येथील गांधी आश्रमातील चार कार्यकर्त्यांची पाकिस्तानी सैनिकांकडून गोळ्या झाडून नृशंस हत्या’ ही बातमी वाचतो. हे चार कार्यकर्ते कबीरचे आदर्श आणि एकेकाळचे सहकारी होते. नोआखाली सोडून जाताना गांधीजींनी आश्रमाचा संचालक चारू चौधरीला सांगितले, ‘‘मी परत येईन. तोपर्यंत तू येथेच राहा आणि आश्रमाचे कामकाज सुरू ठेव.’’ देशाची फाळणी झाली. नोआखाली पूर्व पाकिस्तानात गेले. गांधीजींची हत्या झाली. ते तिथे पुन्हा जाऊ शकले नाहीत. चारू चौधरीने गांधीजींना दिलेला शब्द पाळला. ही कादंबरी गांधीजींच्या प्रेरणेने नोआखालीत राहून समाजसेवेसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या चारू चौधरी, देवेंद्रनाथ सरकार, मदनमोहन चट्टोपाध्याय, अजितकुमार डे, जीवन कृष्ण साहा आणि इतर अज्ञात कार्यकर्त्यांच्या स्मृतीस अर्पण केलेली आहे.
वर्तमानपत्रातील बातमी कबीरला भूतकाळात १९४६ मध्ये घेऊन जाते. तेव्हा कबीर चोवीस वर्षांचा होता. १९४२ च्या चळवळीत तुरुंगात असताना कबीरची बिजॉय चक्रवर्ती या रेव्हील्युशनरी सोशालिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्याशी भेट होते. त्याच्याशी झालेल्या चर्चेतून कबीरला मार्क्सवादाचे आकर्षण वाटते. गांधी विचारांसंबंधी प्रश्न निर्माण होतात. नोआखालीच्या पदयात्रेत गांधींसोबत निघालेल्या कबीरला स्वत:च्या मनाचा व गांधीजींचा शोध लागतो. त्याचे क्षुब्ध मन शांत होते.
गांधीजींचे सचिव प्यारेलाल यांचे ‘द लास्ट फेज- अनुवाद अखेरचे पर्व- ब्रिजमोहन हेडा’ आणि गांधी विचारांचे अभ्यासक व मानववंशशास्त्रज्ञ निर्मलकुमार बोस यांचे ‘माय डेज विथ गांधीजी अनुवाद- गांधीजींच्या जीवनाचे अखेरचे पर्व- सरिता पदकी’ ही पुस्तकं नोआखालीचा इतिहास सांगणारी आहेत. कादंबरीत हा इतिहास विविध व्यक्तींमधील संवादाच्या रूपाने मांडला आहे.
निर्मलकुमार बोस, प्यारेलाल, चारू चौधरी, परशुराम, मनु गांधी, आदिल, ठक्कर बप्पा, मौलाना आझाद, सुशीला नायर, जवाहरलाल नेहरू, साथी राममनोहर लोहिया, सरहद गांधी खान अब्दुल गफ्फार खान, राजेंद्रप्रसाद ही या कादंबरीतील पात्रे आहेत. पिशिमा, सत्यप्रियासारख्या हिंसाचाराचा परिणाम भोगणाऱ्या अनेक व्यक्तीही वाचकांना भेटतात. तत्कालीन पूर्व बंगालचे मुख्यमंत्री सुहराववर्दी आणि हिंदुत्ववादी संघटनेचा अनिरुद्धही आहे. कबीर ज्या सौदतपूर आश्रमात राहत होता त्या आश्रमाचे प्रमुख सतीश बाबू आणि त्यांच्या पत्नी माँ आहेत. या सगळ्यांमध्ये गांधीजी आहेतच. प्रोमीथियस या ग्रीक देवतेची आठवण देत माँ कबीरला म्हणतात. ‘‘महात्माजींनी आपल्या कल्याणासाठी प्रेम, करुणा, सत्य व अहिंसा ही मूल्ये दिलीत. आज आपण कृतघ्न झालो आहोत आणि महात्माजींना प्रोमीथियससारख्या वेदना देत आहोत.’’ हिंसेने होरपळलेल्या वातावरणात निर्भयपणे करुणा व प्रेमाचा संदेश देणारे गांधीजी वाचकांना या कादंबरीत भेटतात.
पूर्व बंगालमध्ये घडणाऱ्या या कथानकाला गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या कवितांची पार्श्वभूमी आहे. कबीर आणि गांधीजींच्या सोबत सतत या कविता आहेत. कादंबरीत आपल्याला ‘बाउल’ काव्यही वाचायला मिळते. बाउल गीत गाणारे सनातन बाबा कबीरला विचारतात. ’‘बडे बाउल बाबा कुठे आहेत?’’ कबीर त्यांना विचारतो ’‘बडे बाउल बाबा म्हणजे?’’ सनातन बाबांचा साथीदार खुदाबक्ष म्हणतो- ‘‘गांधी बाबा.’’ सनातन बाबा सांगतात, ‘‘गांधीजींचा आणि आमचा मार्ग एकच, तो म्हणजे प्रेम आणि करुणेचा. सर्वस्वाचा त्याग करून त्या मार्गावरून चालणाऱ्याला हे जग वेडा बाउलच समजते. बलाढ्य ब्रिटिश साम्राज्याचा सामना अहिंसेने करून पाहणाऱ्याला कोणीही वेडाच समजेल. त्यांचा तो ‘आतला आवाज’ म्हणजे आमचा ‘मनेर मानुषच’ आहे.’’ बाबा त्याला सांगतात, रवींद्रनाथही एक महान बाउल होते. कबीरचा सनातन बाबांशी झालेला संवाद हा कादंबरीतील हृदयस्पर्शी भाग आहे. सनातन बाबा कबीरला म्हणतात, ‘‘बेटा, तू आपल्या हृदयाच्या खिडक्या, दरवाजे उघड. तुझ्यामध्ये मला एक चांगला बाउल बनण्याच्या शक्यता दिसतात.’’ वाचकांच्या हृदयाच्या खिडक्या उघडण्याचे काम कादंबरी करते.
पात्रांमधील संवाद हे या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे. निर्मलकुमार बोस, डॉ. लोहिया, सरहद गांधी, नेहरू, ठक्कर बप्पा, मनु गांधी यांच्याशी कबीरच्या झालेल्या संवादातून या व्यक्तींना हिंसाचाराने झालेल्या वेदना आपल्यापर्यंत पोहचतात. ही सगळी गांधींची माणसं आहेत. त्यांच्याच मार्गाने जाऊन हिंदू- मुसलमानांमध्ये निर्माण झालेला द्वेष संपवण्याचा आणि प्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

  • Rs.270.00
  • Rs.216.00