Dr.Rajendra Barve 6 books Set
Savaiche Gulam ( सवयीचे गुलाम ) शरीराला आणि मनाला सवयी का व कशा लागतात त्यामागील शरीरक्रिया आणि मनोव्यापार कोणते नियमित आहार आणि निद्रा, व्यायाम आणि सकाळचा प्रसन्न उत्साह या सवयींतून प्रकृती.. गैरशिस्त, अव्यवस्थितपणा, व्यसनं आणि भयभीतता या सवयमधून विकृती... आणि वक्तशीरपणा, वागण्या-बोलण्यातील आदब आणि सभ्यपणा या सवयींतून संस्कृती व्यक्त होते. आपल्याला वाटचाल करायची आहे विकृतीकडून... संस्कृतीकडे ! वाईट सवयीमधून सुटका हा फक्त एका क्षणाचा प्रश्न असतो. नकळत घडणाऱ्या चुकीच्या कृतीला टाळायचं असल्यास एखादा क्षणही पुरेसा असतो. तो क्षण असतो तल्लख आत्मभान बाळगण्याचा. तो क्षण असतो मोहातून स्वत:ला सोडविण्याचा. तो क्षण असतो एखाद्या दीर्घ श्वासाकरता त्या दीर्घ श्वासानं मनात सुविचाराला जागा मिळते. त्या दीर्घ श्वासानं क्षणकाल डोळे मिटून आपण मनात तटस्थ भाव जागृत करतो. त्या दीर्घ श्वासानं मनातील मोह, भीती, काळजी आणि धास्ती मिटते. त्या दीर्घ श्वासानं मनाला हुरूप येतो. मनातील आत्मविश्वास खडबडून जागा होतो.
Zatkun Tak Jiva… ( झटकून टाक जीवा... ) मोठ्या विश्वासानं तुम्ही पुस्तक हातात घेतलं आहे आणि ते वाचायचं देखील ठरवलं आहे. तुमच्या मनातल्या या विश्वासाकडे क्षणभर निरखून पाहा, या विश्वासाच्या अंतरंगात लपवलेली 'आशा' तुम्हाला जाणवू लागेल. जसा विश्वास वाढत जाईल, तशी आशाही वाढत जाईल. मित्र हो, तुमच्या मनाला गवसलेला विश्वसाचा हा सूर आणि आशेचं गाणं कायम ठेवा. पुस्तक वाचता वाचता तुम्ही म्हणाल किती सोपं आणि सहज वाटतं नाही निराशेवर मात करणं! ते वाचायला जितकं सहज आणि सोपं वाटतं तसं प्रत्यक्षात आणणं शक्य होईल का? जे कळतंय ते वळेल का? जे समजलंय ते उमजेल का? विचारांचं रूपांतर आचारात होईल का? मित्रहो, या सर्व प्रश्नांची उत्तरं होकारार्थी आहेत. त्यासाठी या पुस्तकाद्वारे काही व्यावहारिक सूचना मांडणारा आहे. पुस्तक वाचून करावयाच्या स्वाध्यायाची माहिती देणार आहे. तुम्ही देखील पुस्तकाचे मन लावून वाचन करा. त्यातील मुद्द्यावर चिंतन करा. याच उपस्थित केलेल्या मुद्द्यांची सहकारी किंवा साथीदाराबरोबर चर्चा करा. त्यांचं मत आजमावा आणि निराशेवर मात करण्याचा प्रयत्न करीत राहा.
Mansik Tantanav kasa rokhal? ( मानसिक ताणतणाव कसा रोखाल? ) माणसानं विज्ञानाच्या जोरावर निसर्ग व रोगराई काबूत आणली. प्रगती झपाट्याने होऊ लागली. पण माणूस सुखावला का ? समाधानाचा निःश्वास त्यानं टाकला का? की प्रगतीच्या रेट्याखाली तो दडपला गेला ? दळणवळण सोयीस्कर झालं पण मनं जुळली का? उत्पादन वाढलं पण मन:शांती वाढली का? साधनसंपत्ती दुणावली पण मानसिक संतुलन ढळलं का? साथीचे रोग काबूत आले पण शरीर सुदृढ झालं का? प्रगतीच्या आडोशानं उभं राहून काही नव्याच समस्या चोरपावलानं आपल्या जीवनात येत आहेत. नवे शत्रू निर्माण होत आहेत. या नव्या शत्रूंमुळे माणसं पटापट मरत नाहीत. तर त्यांचं शरीर पोखरलं जातं. प्रगतीशील माणसानं एक नवाच शत्रू निर्माण केलाय. आधुनिक युगात शत्रू आहे मानसिक ताण! स्ट्रेस!!
Bhayaganda Tumche Uttar Maze ( भयगंड तुमचे उत्तर माझे ) भयगंड, औदासीन्य किंवा चिंताग्रस्तता अथवा छिन्नमनस्कता ह्या केवळ विकारग्रस्त मनोवस्था आहेत, ते आजार आहेत. जसा हृदयाला, मूत्रपिंडाला, जठराला या विविध अवयवांनाविकार तसाच मन या संस्थेला विकार जडतो. मन या संस्थेचा अवयव ‘मेंदू’! म्हणजे मेंदूच्या क्रियापद्धतीमध्ये बिघाड झाला तर मानसिक अस्वस्थता, बेचैनी अगर चिंतेचा झटका येऊ शकतो. हे निर्विवादपणे शास्त्रसंमत झाले आहे. याच निखळ शास्त्रीय व मनोवैज्ञानिक विचारांचा प्रस्तुत पुस्तकामध्ये पाठपुरावा केलेला आहे.
Katha Palakanchaya Vatha Mulachya ( कथा पालकांच्या व्यथा मुलांच्या ) या पुस्तकात मांडलेल्या कथांमधील किंवा एरवी व्यावसायिक म्हणून भेटणारे पालक हेतुत: मुळीच वाईट नसतात. मुलांना चांगलं वळण लागावं, त्यांचं भवितव्य उज्ज्वल व्हावं, अडचणीहीन आयुष्य मिळावं, आपल्या ठेचा त्यांना खाव्या लागू नयेत अशा सद्हेतूनं ते प्रेरित झालेले असतात; परंतु त्यांना आपला हेतू अर्थपूर्णपणे मुलांपर्यंत पोहोचवता येत नसतो. ज्या पद्धतीनं मुलांपर्यंत या गोष्टी पोचतात, कम्युनिकेट होतात, त्यामुळे फार घोळ होतो. तो कसा होतो?त्याचे तपशील तपासले पाहिजेत. तो कसा टाळता येईल याविषयी चिंतन आणि मनन केलं आहे तेच या पुस्तकामधून मांडलं आहे.
Tumchi Zop Tumchaya Hati ( तुमची झोप तुमच्या हाती) प्रिय वाचक, "तुमची झोप तुमच्या हाती'ची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली तेव्हा झालेल्या समारंभात मी असं म्हटलं होतं की, माझी लेक बाचकांना देत आहे: त्यानी ती स्वीकारावी. वाचकांनी तिला खुल्या मनाने स्वीकारली आहे, याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे. अनेक वर्षांच्या अनुभवाचं सार वाचकांपर्यंत पोहोचल्याचा तो आनंद आहे. परंतु या क्षणी मात्र माझ्या भावना संमिश्र आहेत. भावना समिश्र आहेत अस म्हणण्याचं कारण असं की, झोपेवरचं पुस्तक इतक्या झपाट्याने संपतं याचा अर्थ आपल्या समाजाचं मानसिक आरोग्य ठीक नाही! अनेक माणसांना खरोखरच झोपेच्या आणि तदनुषंगिक मानसिक समस्यांनी ग्रासलेलं आहे. आपल्या समाजाच्या या अस्वस्थ परिस्थितीने मन व्यथित होत आहे आपल्या समाजातलं मानसिक अस्वास्थ्याचं दुष्टचक्र कुठे तरी थांबवायला हवं आणि त्या दृष्टीने हा माझा एका मिणमिणत्या पणतीचा प्रयत्न आहे. अशा प्रकारची पुस्तक इंग्रजीमध्ये उपलब्ध असतात हे तर सर्वज्ञात आहे; परंतु प्रत्येक वेळी इंग्रजीकडे आशाळभूतपणे पाहायला लागू नये, असा बाड्मय प्रकार मराठीत निर्माण करणं शक्य आहे आणि त्याला वाचकांकडून उदंड प्रतिसाद मिळू शकतो, हेच या पुस्तकाने सिद्ध होत आहे. वाचकांनी या पुस्तकाच्या निमित्ताने पत्र पाठवून मनमोकळी दाद दिली. आभार मानले, याबद्दल मी बाचकांचा कृतज्ञ आहे
Dr.Rajendra Barve
डॉ. राजेंद्र बर्वे