Buddhansobat Kshanokshani
गौतम
बुद्धांच्या विचारांचा आजच्या जगण्यामध्ये मानसिक आरोग्याच्या दृष्टीने कसा
अभ्यासू उपयोग करून घेता येईल, या हेतूने त्या साहित्याचे
नव्याने वाचन सुरू केले. वाचताना नोट्स काढायला लागलो तर त्या आपोआप पद्यामध्ये
उमटू लागल्या. त्या प्रक्रियेची मजा वाटू लागली. लिहिलेल्या कविता समाजमाध्यमांवर
अपलोड करू लागलो. या कवितांना कलात्मक दृश्यरूप देऊ लागला मित्र-सहकारी अतुल
कस्तुरे. एप्रिल २०२० मध्ये माझे शब्द आणि त्याची कला ही मैत्री सुरू झाली.
जानेवारी २०२२ पर्यंत या कवितांसोबत रचलेल्या अन्य कवितांचा मिळून चक्क चारशे कवितांचा
टप्पा आपोआपच पार झाला. २०२१ साली 'अव्यक्ताचा आरसा' हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला (बुकगंगा प्रकाशन) आणि आता हा दुसरा.
बुद्ध कवितांवर खूप छान प्रतिसाद मिळत असे. त्यातले काही वाचक कवितांवर प्रश्न
विचारू लागले, म्हणून प्रत्येक कवितेसोबत एक टिपण लिहायला
लागलो. होता होता एप्रिल २०२१ पासून सप्टेंबर २०२१ पर्यंत एकूण एकशेदोन कविता
शब्दबद्ध झाल्या. आत्मविकासाच्या मार्गावर स्वाध्यायासाठी हे पुस्तक प्रथम चवीने
बाचावे. नंतर त्यातील शब्दांवर स्वतःचा विचार करावा, असे
अपेक्षित आहे. २०१० साली भुतानच्या पर्यटन सफरीवर असताना बौद्धपौर्णिमेच्या दिवशी
या अभ्यासाची सुरुवात झाली. अलीकडे महायान विचारांचा अभ्यास अधिक खोलात जाऊन केला.
गेली दहा वर्ष वेदान्त तत्त्वज्ञानाचा अभ्यासही समांतरपणे सुरू आहे. त्या
पार्श्वभूमीवर बुद्धाचे विचार जास्त स्पष्ट कळू लागले, असा
अनुभव मला आला. दरम्यान ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव यांचा अभ्यासही सुरू झाला. या
साऱ्याचे पडसाद या लेखनामध्ये आपोआप उमटले आहेत. आद्य शंकराचार्यांचे काही साहित्य
तसेच पातंजल योगदर्शन याचेही वाचन सुरू आहे. या कवितांबरोबर मी काही गद्य लेखनही
करत होतो आणि आहे. त्यातल्याच काही लेखांचे ऑडिओ मध्यंतरी अनेकांनी ऐकले आणि
भावनिक कसोटीकाळामध्ये त्यांना ते उपयुक्त वाटले. त्या गद्य लेखनाचा प्रपंच
वेगळ्या पुस्तकात करायचा मानस आहे. तोवर बुद्ध आणि त्यांच्यासोबत इतरही
महापुरुषांसोबतचा हा क्षणोक्षणीचा अनुभवप्रवास तुम्हा सर्व वाचकांच्या मनाशी जोडत
आहे.
- डॉ. आनंद नाडकर्णी
Dr.Anand Nadkarni
Buddhansobat Kshanokshani
बुद्धांसोबत क्षणोक्षणी