Bhukamp
भूकंप आणि सुनामी
जेव्हा ‘पायाखालची जमीन सरकते’ हे शब्दश: खरे ठरते, तेव्हा तो अनुभव फारच भीतिदायक असतो.
भूकंपाचे आणि सुनामीचे परिणाम काही क्षणातच मोठी नासधूस आणि प्राणहानीला
कारणीभूत ठरतात. कोयना आणि भूजचे भूकंप आजही त्या भयानकतेची आठवण
देतात. भारताच्या पूर्व किनाऱ्यावर आलेल्या सुनामीच्या जखमाही
अजून भरलेल्या नाहीत. काहीही ध्यानीमनी नसताना अचानक येणाऱ्या
या दुर्दैवी आपत्तीला ‘दैवी कोप’ ठरवणे
हे इतिहासकाळात जरी क्रमप्राप्त होते, तरी आधुनिक विज्ञानाला
ते पटणे अवघड. मग भूकंप का होतो, कसा होतो,
कोठे होतो याचा शोध घेणे सुरू झाले. त्यातून असे
लक्षात येते, की आपण ज्याला जमीन म्हणतो, ती जणू पृथ्वीच्या पोटातल्या तप्त शीलारसावर तरंगणाऱ्या सायीप्रमाणे आहे.
या सायीचे, अर्थात भूपट्टांचे विविध तुकडे आहेत
आणि ते ठराविक प्रकारे हालचाल करतात. काही ठिकाणी लाव्हा भूगर्भातून
वर येत त्याची नवी जमीन बनत असते. त्यामुळे भूपट्ट दूर ढकलले
जातात, तेव्हा ते एकमेकांवर घासले जातात, कधी एकमेकांवर चढतात तर त्यातला खाली जाणारा भूपट्ट खालच्या शीलारसात विरघळूनही
जातो. या साऱ्या हालचालींमुळेच भूकंप होतात.
या सगळ्या शोधांचा मागोवा घेणारे हे पुस्तक, आकर्षक रंगीत चित्रांमधून वैज्ञानिक माहिती विषद करून सांगणारे आहे. कायम आपल्या संग्रहात ठेवावे असे हे पुस्तक विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनाही त्यांच्या जिज्ञासेची पूर्ती करणारे ठरावे.
भूकंप - आनंद घैसास