Jata Mukti
भारताच्या विस्तीर्ण आध्यात्मिक परंपरेत जटा केवळ आध्यात्मिक बंधनाचे प्रतीक
म्हणून ओळखल्या गेल्या, परंतु त्या पलीकडे काही विशिष्ट परिस्थितींमध्ये केसांत
जटा निर्माण होतात. त्यामागची कारणे आजही आधुनिक विज्ञानासाठी गूढ आहेत,
परंतु स्त्रियांच्या आरोग्याशी निगडित या समस्येचे स्वतंत्र अस्तित्व आहे.
अंधश्रद्धा, चुकीने दृढमूल झालेला पारंपरिक विश्वास आणि धर्माधारित रूढी यांच्या
प्रभावामुळे अनेक स्त्रिया स्वतःच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊनही जटा काढण्यास
धजावत नाहीत. अशा स्थितीत त्यांना केवळ आधारच नव्हे, तर त्यांच्या जगण्याच्या
लढाईला दिशा देणारा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मदतीचा हात आवश्यक असतो.
सामाजिक आणि पितृसत्ताक मानसिकतेने जखडलेल्या या स्त्रियांना स्वातंत्र्य मिळवून
देण्याच्या दिशेने जटा निर्मूलन आंदोलन हा क्रांतिकारी टप्पा ठरला. या चळवळीने
महिलांच्या शरीरावरचा त्यांचा स्वतःचा हक्क अधोरेखित केला, तसेच वैज्ञानिक विचार,
आरोग्य, मानवाधिकार आणि उपेक्षित महिलांच्या अस्तित्वाला प्रतिष्ठा दिली.
हे पुस्तक अशाच अनेक स्त्रियांच्या जटा मुक्तीच्या प्रवासाची कहाणी सांगते.
त्यामागची ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्यांनी सोसलेल्या यातना आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून
या अंधश्रद्धांना कसा तडा गेला, हे उलगडण्याचा प्रयत्न यात केला आहे.
ही कहाणी केवळ जटा निर्मूलनाची नाही, तर स्वतंत्र विचारसरणी, स्त्री-हक्कांची जागृती
आणि विज्ञानाच्या मदतीने सामाजिक परिवर्तन घडवण्याच्या सामर्थ्याची आहे.
आदिवासी, दलित आणि बहुजन समुदायांच्या स्वतंत्र सांस्कृतिक अस्तित्वाला आणि
त्यांच्या संघर्षाला वैज्ञानिक दृष्टीकोन व विवेकवादाची जोड देत अंधश्रद्धेच्या जोखडातून
मुक्त होण्याचा आणि करण्याचा हा प्रवास प्रत्येक वाचकाला अंतर्मुख करेल.
या परिवर्तनाची जाणीव तुम्हाला नव्या विचारांचा भाग बनवेल आणि
विज्ञाननिष्ठ समाजाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्यास प्रेरित करेल!
Jata Mukti : Dr. Sudhir Shantabai Annasaheb Kumbhar
जटा मुक्ती । डॉ. सुधीर शांताबाई आण्णासाहेब कुंभार