Atal -Avichal - Mukhyamantranna Gheraw Ghalnara Vidyarthsallagari Te Mukhyamantryancha sallagar
ब्रिटिश काळातल्या गोऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एका अर्थाने विपुल असं लेखन केलेलं आढळतं.
यापैकी काही लेखन ब्रिटिश प्रशासनाला साहाय्यभूत ठरणारं असं होतं, उदाहरणार्थ ‘अँडरसन मॅन्युअल'.
हे पुस्तक तर आजही महसूलातलं बायबल आहे. काही गोऱ्या साहेबांनी भारतीय संस्कृतीबद्दल, भारतीय इतिहासाबद्दल,
भाषांबद्दल कुतुहल दर्शवून त्या संदर्भात बरचसं लिखाण केलं आहे. काहींनी सामाजिक अंगानेसुद्धा लिहिलं आहे.अन्य ब्रिटिश लेखकांनीसुद्धा तत्कालिन समाज, भारतीय माणसाची मनोवृत्ती, राजे-महाराजे यांच्या सवयी इत्यादींबद्दल लिहिलेलं आहे. तद्नंतर, भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी काहीएक महत्त्वाचं लेखन केलेलं आहेच.
याच परंपरेमध्ये आता ‘अटल-अविचल' या डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या आत्मकथनाची भर पडलेली आहे.
औरंगाबादल विभागीय आयुक्त कार्यालयात मी त्यांच्या सोबत काम केलेलं आहे.
शिस्तप्रिय, पद्धतशीर काम करणारा (चशींहेवळलरश्र) आणि स्वच्छ चारित्र्याचा अधिकारी म्हणून
डॉ. दिपक म्हैसेकरांची ओळख सर्वत्र प्रचलित होती. ‘अटल अविचल' मध्ये त्यांनी लोकाभिमुख प्रशासनाची
कहाणी रसपूर्ण भाषेत आणि ओघवत्या शैलीत सांगितली आहे. महसूल विभागाच्या सर्वोच्च पदाला स्पर्श करताना आलेल्या अनेक अवघड प्रसंगात ते अटल आणि अविचल राहिले याचा त्यांना रास्त अभिमान आहे. त्यांचं हे आत्मकथन अनेक अंगांनी वाचनीय, स्मरणीय असं असून महसूल विभागामध्ये ‘अटल' राहण्याची काय किंमत मोजावी लागते याचा लेखाजोखा या कथनात अतिशय प्रांजलपणे मांडलेला आहे. इतकंच नाही तर, डॉ. म्हैसेकर यांनी मराठी रसिकवाचकाला या प्रशासनातल्या आंतरविश्वाचं समर्थपणे दर्शन घडविलं आहे. त्या योगे मराठी साहित्यविश्वातील आत्मकथनाच्या परंपरेत मोलाची भर पडलेली आहे. या मौलिक लेखनाबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो.
भारत सासणे, माजी संमेलनाध्यक्ष व ज्येष्ठ कथाकार
अटल अविचल - डॉ. दीपक म्हैसेकर
Atal - Avichal - Dr. Dipak Mhaisekar
मनोगत
माणूस जेव्हा आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर चाकोरी सोडून वेगळं काही करतो आणि त्यातून काहीतरी नवनिर्माण घडतं तेव्हा त्याचं ते आयुष्य इतरांसाठी प्रेरक ठरतं. म्हणून ते लोकांपर्यंत जाणीवपूर्वक पोचवलं जातं. माझा जीवनप्रवास असा प्रेरक आहे की नाही हे मला सांगता येणार नाही. मात्र माझ्या एकूण प्रवासातील जे काही प्रेरक क्षण तुम्हाला या आत्मकथनात सापडतील त्याचं श्रेय माझ्यातल्या काहीतरी वेगळं करून दाखवण्याच्या उर्मीला आणि समाजाप्रती असणाऱ्या समर्पणच्या भावनेला मी देऊ इच्छितो. हे दोन्ही अत्यंत महत्वाचे गुण माझ्या व्यक्तिमत्वात नसते तर आजवर मी जी ‘अटल-अविचल' अशी वाटचाल केली ती होऊ शकली नसती. माझा अटल-अविचल असा प्रवास घडला तो आई-वडील यांनी केलेल्या संस्कारामुळे.
खरं सांगायचं तर माझं आयुष्य म्हणजे आई-वडिलांनी केलेल्या संस्कारांचे संचयन होय. आजवरच्या वाटचालीत या संस्कारांचा वाटा खूप मोठा आहे. काहीतरी वेगळं करून दाखवण्याची उर्मी मला या संस्काराने जशी दिली तशीच समाजाप्रती समर्पणाची भावना माझ्या मनात याच संस्कारांनी निर्माण केली. या अर्थाने माझ्या आयुष्यातले पहिले दोन सार्थ गुरू म्हणजे माझे आई-वडील होत. म्हणूनच मी आई आणि वडील या दोघांना हे आत्मकथन अर्पण केलं आहे. त्यांनी माझ्यातल्या ओबडधोबड दगडाला अत्यंत सुरेख अशा मूर्तीचं रूप दिलं. पुढे शैक्षणिक जीवनात या मूर्तीला साजेसा पोषाख चढवून सजवण्याचं, विविध अलंकारांनी मढवण्याचं काम विविध गुरूजनांनी केलं. त्यामुळे माझ्या जडणघडणीत आणि आजवरच्या वाटचालीत आई-वडिलांप्रमाणेच विविध टप्प्यांवर भेटलेल्या गुरूजनांचंही तितकंच योगदान आहे हे मी नम्रपणे इथे नमूद करू इच्छितो.
सेवानिवृत्तीनंतर मा. मुख्यमंत्र्यांचा सल्लागार, राज्य पर्यावरण मूल्यमापन समितीचा अध्यक्ष तसेच कोविड दस्ताऐवजीकरण समितीचा मुख्य समन्वयक अशा काही भूमिका बजावल्या. त्याबाबत नंतर कधीतरी लिहावं असा माझा मानस आहे.
माझं बालपण, माझे शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण आणि त्यानंतर मी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सेवा केल्या - सेवा हा शब्द मी फार जाणीवपूर्ण वापरतो. नोकरी आणि सेवा या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. शासकीय सेवेला नोकरी न मानता, ज्या समाजासाठी मी शासनाच्या वतीने काम करत होतो त्या समाजाला परिपूर्ण सेवा देण्याचा मी प्रयत्न केला हे विनम्रपणे नमूद करू इच्छितो - या सेवा कालावधीचे माझे अनुभव, आठवणी या पुस्तकात आहेत.
या पुस्तकामध्ये माझ्या जन्मापासून ते मी सेवानिवृत्त होईपर्यंतचा जीवनपट आहे. तो पाहताना ज्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वकर्तृत्व गाजवलं आहे अशा अलौकीक व्यक्तिमत्त्वांशी माझी कुठेही तुलना व्हावी किंवा केली जावी असं मला मुळीच वाटत नाही. या मागे दोन कारणे आहेत. एक तर तशा परिस्थितीशी मला झगडावं लागलं नाही आणि दुसरं, मी कुठल्या कम्फर्ट झोनमध्ये अडकून राहिलो नाही. आर्थिक, शैक्षणिक या दोन्ही बाबींचा समृद्ध वारसा मला मिळाला होता. आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसली तरी समाधानाची होती. शैक्षणिकदृष्ट्या आईवडील दोघेही शिकलेले असल्यामुळे त्यांचं भक्कम पाठबळही हेोतं. थोडक्यात म्हणजे मी सुखी समाधानी कुंटुंबातील व्यक्ती होतो. अर्थात बहुतांशी व्यक्ती अशा कम्फर्ट झोनमधून किंवा साचेबद्ध अशा चाकोरीतून बाहेर पडू इच्छित नाहीत. याबाबतीत मी मात्र अपवाद ठरलो असं मला वाटतं. सातत्याने काहीतरी वेगळं, नाविन्यपूर्ण करण्याकडे माझा कल राहिलेला आहे.
पुढे शासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र या सर्वच भागांमध्ये काम करण्याची संधी मला मिळाली. एकूण प्रशासकीय कारकिर्दीत मला वेगवेगळ्या चौदा ठिकाणी काम करायला मिळालं. प्रत्येक ठिकाणची जबाबदारी तर वेगळी होतीच, पण त्या त्या ठिकाणचं वातावरणही वेगळं होतं. त्यातून दोन गोष्टी साध्य झाल्या. एकतर कम्प्फर्ट झोन तयार झाला नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे राज्याच्या वेगवेगळ्या विभागात काम करताना महाराष्ट्राच्या एकंदर परिस्थितीचं समग्र असं आकलन झालं.
ज्या महाविद्यालयात माझं शिक्षण झालं तिथे वडीलच प्राचार्य होते. पण म्हणून तिथे मला विशेष अशी कोणतीही वेगळी वागणूक दिली गेली नाही ना मी ती घेतली. पुढे मुंबईमध्ये पशुवैद्यक महाविद्यालयामध्ये शिकताना तर स्वत:च्या संपर्क कौशल्यामुळे विद्यार्थी नेता म्हणून निवडून आलो. याच महाविद्यालयात माझ्या व्यक्तिमत्त्वामध्ये आमूलाग्र बदल झाला असे मला स्वत:ला वाटते. कारण इथं माझ्यातल्या नेतृत्व गुणांना वाव मिळाला आणि माझ्यातला प्रशासकही इथेच जागा झाला. मात्र न्याय्य हक्कासाठी मुख्यमंत्र्यांना घेराव घालणारा विद्यार्थी नेता पुढे जाऊन एक प्रशासक या नात्याने मुख्यमंत्र्यांचा सल्लागार होईल असं कधी वाटलं नव्हतं. पण माझ्या आयुष्यात हे घडलं आहे.
पशुवैद्यक महाविद्यालयात शिकत असताना पहिल्याच वर्षी विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं होतं. त्याच आंदोलनाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना घेराव घातला होता. स्वतःच्याच विश्वात मग्न असलेला अबोल असा मी; विद्यार्थी आंदोलनाच्या निमित्ताने अंतर्बाह्य बदलून गेलो. माझ्या व्यक्तिमत्वाला विविध कंगोरे पडत गेले. त्यातून ‘आयुष्यात काहीतरी वेगळं करून दाखवावं' या उर्मीला अधिक बळ मिळत गेलं. सातत्याने नवनवे प्रयोग करत राहिलो. त्यात कितपत यशस्वी झालो हे माहीत नाही पण नाविन्याचा ध्यास कधी सुटला नाही.
पशुवैद्यकशास्त्रातली पदव्युत्तर पदवी घेताना विद्यार्थ्यांना एक प्रबंध सादर करावा लागतो. बहुतांश विद्यार्थी त्यासाठी नेहमीचे, पठडीतले विषय निवडतात. ज्यावर कोणी काम केलेलं नाही असे विषय सहसा कोणी निवडत नाही. मी मात्र असाच ‘सायटो-जेनेटिक्स'मधला विषय निवडून त्यावर संशोधनपर प्रबंध सादर केला होता. माझा तो राज्यातल्या पशुवैद्यक क्षेत्रातला पहिला प्रयत्न ठरला होता. प्रशासकीय सेवेत दाखल झाल्यानंतरही असे वेगळे प्रयोग करत राहण्याचा माझा ध्यास सुटला नाही. जिथं जाईल तिथं मी सातत्याने नाविन्यपूर्ण प्रयोग करत गेलो. ग्रामसेवकांचं प्रशिक्षण, पैठणच्या प्रबोधिनीची स्थापना, विभागीय आयुक्त कार्यालयातील विकास शाखेच्या बळकटीकरणाचा अहवाल, बचतगटांच्या उत्पादनांचं ब्रँडिंग तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांचं भाऊबीज भेटीच्या निमित्तानं सबलीकरण, नकोशींचा सन्मान अशा काही प्रयोगांचा त्यात समावेश होऊ शकेल.
सामाजिक उन्नयनाच्या हेतूने काही काम करत असताना प्रामाणिक प्रयत्न खूपच आवश्यक ठरतात. मला वाटतं प्रशासकीय सेवेत काम करताना प्रामाणिक प्रयत्न करणं हेच आपल्या हाती असतं आणि नाविन्यपूर्ण प्रयोग राबवताना मी तेच करत आलो आहे. जे स्वत:ला पटते, योग्य वाटते ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं आणि तो करताना शंभर टक्के योगदान देण्याच्या दृष्टीने मेहनत घेणं हीच माझी भूमिका राहिली आहे. अगदी सुरूवातीच्या परिविक्षाधीन कालावधीत केलेल्या कामापासून ते विभागीय आयुक्त म्हणून निवृत्त होईपर्यंत मी ही भूमिका सोडली नाही.
या साऱ्या प्रवासात माझ्या आयुष्याला महत्त्वाची कलाटणी देणारी पोस्टिंग म्हणजे नांदेड महापालिका आयुक्त ही होय. अत्यंत आव्हानात्मक कालावधीमध्ये माझ्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आलेली होती. तेव्हा नागरी प्रशासनाचा कसलाही अनुभव माझ्याकडे नव्हता. किंबहुना, नागरी स्वराज्य संस्थेमध्ये कसं काम करायचं याची माहिती नव्हती. अशा पार्श्वभूमीवर मी हे आव्हान स्वीकारलं. नागरी प्रशासन, नागरी प्रश्न समजून घेतले. इतकंच नाही तर पंधरा-सोळा महिन्यांच्या कालावधीत विविध प्रकल्पांना गती देऊन नियोजित विकास साध्य करण्याच्या दृष्टीने वेळेचं गणित बसवून नियोजन केलं. त्याप्रमाणे सर्व कामे पुढे गेली पाहिजेत म्हणून 18-18 तास अक्षरशः राबलो. इतकंच नाही तर पूर, भूकंप, दुष्काळ अशा आपत्तींशी सामना करत आणि अनेक आव्हाने स्वीकारत ही नांदेडची कारकीर्द मी पार पाडली. ती पार पाडताना तिथल्या गरिबांसाठी एकोणीस हजार घरे उभारली. विद्यार्थांसाठी स्पर्धात्मक परीक्षांच केंद्र सुरू केलं. जेव्हा ई-लर्निंगबाबत चर्चासुद्धा नव्हती तेव्हा तिथल्या शाळांमध्ये ई-लर्निंगचे प्रकल्प राबवले. चार वर्षांच्या कार्यकालात नांदेड शहराची नव्यानं जडणघडण केली. त्यावर देशपातळीवरील महत्त्वाच्या तीन पुरस्कारांनी शिक्कामोर्तब केलं.
अर्थात सामान्य माणसाचं समाधान यालाच मी माझ्या कामाची पावती मानतो. त्यादृष्टीने नांदेडकरांच्या चेहऱ्यावरील समाधान मला या पुरस्कारांपेक्षाही अधिक आनंद देणारं होतं. किंबहुना नांदेड शहरासाठी मला काही करता आलं ही भावना मला अधिक समाधान देऊन गेली. याचं कारण या शहराशी माझे भावनिक नाते जडलेले आहे. याच शहरात मी लहानाचा मोठा झालो . वयाच्या चौथ्या किंवा पाचव्या वर्षी मी नांदेडमध्ये आलो. तिथपासून मुंबईला शिकायला जाईपर्यंत त्या शहराशी माझी नाळ जुळलेली होती. माझ्या आयुष्याच्या जडणघडणीचा महत्त्वाचा काळ मी या शहरात घालवला आहे. त्यामुळे ज्या शहराने आपल्या घडवलं त्या शहराचीच जडणघडण आपल्या हाताने व्हावी यासारखं वेगळं समाधान नाही.
सेवेच्या शेवटी शेवटी कोविडसारख्या आव्हानाला सामोरं जाण्याची परिस्थिती निर्माण झाली. मी जी काही शासकीय सेवा केली त्याची ती अंतिम अशी खडतर परीक्षा होती असे मला वाटतं. देशपातळीवर सोडून द्या, जागतिक पातळीवरही या रोगाबद्दल माहिती नव्हती. रोज होणारे मृत्यू, रोज होणारी रोगाची नवीन संक्रमणे याच्यावर काय उपाययोजना करायची याबाबतीत कुठलीही स्पष्टता नव्हती. हा आजार कधी संपणार हेही माहीत नव्हतं. अत्यंत जीवघेणं वास्तव सुरू झालं होतं. आजवर जी काही आव्हानं मी स्वीकारली होती त्यातलं हे अंतिम आणि सगळ्यात कठीण आव्हान होतं.
या आव्हानाला तोंड देताना कामासाठी अठरा-अठरा तासही कमी पडायचे. सकाळी पाच वाजता उठून मी कामाला लागायचो. कोविडची अगोदरच जिथं लाट आलेली आहे त्या देशात काय घडतंय याची माहिती घेणं, मिळालेली माहिती समजावून घेणं, सात ते नऊ या वेळेत पुणे विभागातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त यांच्याकडून स्थानिक परिस्थितीचा आढावा घेणं व त्याची माहिती वरिष्ठांना देणं, दहानंतर, रात्री आठ-नऊपर्यंत बैठकांचा कार्यक्रम, कोविडग्रस्त भागांना भेटी, लॉकडाऊनमुळे निर्माण झालेले वेगवेगळे प्रश्न या सर्वांची सोडवणूक करता करता दिवस कधी संपून जायचा कळायचे नाही. थकूनभागून घरी आल्यानंतरही दिवसभरातल्या एकूण परिस्थितीचा पुन्हा आढावा घेणं, वरिष्ठांबरोबर चर्चा करणं, त्यांना फिडबॅक देणं असं सारं सुरू असायचं. बरं हे सारं निवृत्तीला पाच-सहा महिने बाकी असताना घडत होतं. पण म्हणून प्रयत्नात कुठेही कसूर होऊ दिली नाही. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहिलो. कारण ती त्या काळाची मागणीच होती.
खरं तर प्रशासकीय सेवेत असे आणीबाणीचे प्रसंग केव्हाही येऊ शकतात. त्याच्याशी दोन हात करण्याची तयारी सतत तुम्हाला जबाबदार आधिकारी म्हणून ठेवावीच लागते. माझ्या संपूर्ण सेवेमधील दोन-तीन गोष्टींचा विशेष उल्लेख करावा असं मला वाटतं. एक म्हणजे मला नैसर्गिक आपत्तींना वेळोवेळी तोंड द्याव लागलं. त्यात नांदेड, चंद्रपूर, कोल्हापूर, सांगली येथील पूर परिस्थितीशी चांगला निकराचा सामना करावा लागला होता. त्याचप्रमाणे दुष्काळ, भूकंप यासारख्या आपत्तींशीही मी लढलो आहे आणि त्यातून बाहेर काढत लोकांचं आयुष्य सुरळीत करण्याचा प्रयत्न केला आहे. 2005 मध्ये झालेल्या मुंबईच्या ढगफुटीलाही मी सामोरे गेलो आहे.
विविध नैसर्गिक आपत्तींशी सामना करण्याचा प्रदीर्घ अनुभव हे जसं माझ्या प्रशासकीय सेवाकाळाचं एक वैशिष्ट्य आहे तसंच तीर्थक्षेत्र विकासाच्या कामाचा अनुभव हे एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे. याची सुरुवात नांदेडपासून झाली. गुरु-ता-गद्दीच्या सोहळ्यानिमीत्त शिख धर्मियांची दक्षिण काशी असलेल्या नांदेड शहराचे पुनर्निर्माण आणि सोहळा आयोजनाच्या वेळेस लागणाऱ्या पायाभुत सुविधांची व्यवस्था करण्याचे कार्य माझ्या हातून घडले. नागपूर येथे काम करत असताना ‘बुद्धिस्ट सर्किट'चं काम, चैत्य भूमीचे काम, कोराडी देवी परिसर विकास कामे, ताजोद्दीनबाबा दर्गा परिसराचे काम अशा वेगवेगळ्या धार्मिक क्षेत्रांसाठी मला काम करावे लागले. पुणे येथे विभागीय आयुक्त असताना दोन्ही पालखी मार्गाचे काम करण्याची जबाबदारी मी पार पडली असून पंढरपूर विकासामध्ये अंशदान देण्याचा सुयोगही माझ्या वाट्याला आला आहे.
या व्यतिरिक्त वेगवेगळ्या नद्यांना पुनर्जिवीत करण्यासाठी केलेला प्रयत्न हाही माझ्या करकिर्दीचा विशेष भाग राहिलेला आहे. त्यात कोल्हापूरातल्या पंचगंगेला प्रदूषणमुक्त करण्यासाठी राबवावयाच्या प्रकल्पाचा आराखडा तयार करणे, नांदेडच्या गोदावरी नदीच्या घाटाचा विकास करणे, चंद्रपूरातल्या इरई नदीचं खोलीकरण करणे अशा विविध कामांचा समावेश आहे.
आयुष्याच्या सुरुवातीला माझ्या पूर्वजांचे, आईवडिलांचे जे संचयित होते त्यातून मी माझ्या सेवाकालावधीमध्ये त्यातील जे समर्पित करणे शक्य होते ते सर्व समाजासाठी समर्पित केलं. यामुळे तर आज कोणतीही खंत न बाळगता मी समाधानी आहे. माझ्या मते हीच माझ्या आयुष्याची कर्तव्यपूर्ती आहे. हेच परमोच्च सुख आहे असं मला मनापासून वाटतं. यापुढे आयुष्य कोणते वळण घेईल हे आजतरी मला माहीत नाही पण गेल्या तीस-पस्तीस वर्षामधे मी जे काही महत्त्वाचं अनुभवलं त्याच हे प्रामाणिक कथन आहे.
आयुष्यात जे जे घडलं ते मी इथे संपूर्ण कथन केलेले आहे असे नाही. मात्र जे जे सार्वजनिक जीवनाच्या दृष्टीने आवश्यक आहे त्या सर्व गोष्टींचे इथे वस्तुनिष्ठ कथन करण्याचा प्रयत्न मी केला आहे. कदाचित हा कालावधी एवढा मोठा होता आणि त्यातले अनुभवही एवढे वेगवेगळे इतके विस्तृत होते की, त्याच्यावर अजून एखादं दुसरं पुस्तक लिहावं लागेल. असे काही माझ्या हातून लिहिले जाईल याबाबत आजतरी मी नक्की काही सांगू शकत नाही पण तसा माझा प्रयत्न राहील हे मात्र नक्की.
खरंतर आपले अनुभव लिहावेत, आठवणी नोंदवाव्यात असा काही विचारही माझ्या डोक्यात नव्हता. मात्र माझे मित्र डॉ. रविंद्र तांबोळी आणि त्यांच्यासोबत मनोविकास प्रकाशनाचे संस्थापक संचालक अरविंद पाटकरजी यांच्या आग्रहामुळे या अनुभवांना, आठवणींना मूर्त स्वरूप आलं ही वस्तुस्थिती आहे. अनेक आव्हानांना सामोरं जातानाच प्रशासनाला लोकाभिमुख बनवण्याचा आपण केलेला प्रयत्न लोकांपर्यंत यायला हवा हे पटवून देत या दोघांनीही केलेल्या अथक पाठपुराव्यामुळेच मी हे पुस्तक लिहायचा प्रयत्न करू शकलो, हे मी नम्रपणे नमूद करू इच्छितो.
हे पुस्तक लिहिताना मनोविकासचे संपादक विलास पाटील, सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका अमिता नायडू यांचे जे सहकार्य मिळाले ते शब्दातीत आहे. विशेषतः अमिता नायडू यांनी माझ्या ध्वनिमुद्रित अनुभवांना संपादकीय संस्कार करून पुस्तकरूपात मांडण्याचं अत्यंत कठीण काम केलं आहे. त्यांच्या मदतीशिवाय हे पुस्तक पूर्ण होऊ शकलं नसतं, याची मला जाणीव आहे. त्याचबरोबर माझे मित्र डॉ. रविंद्र तांबोळी, डॉ. सुनील चिद्रावार, स्वीय सहाय्यक अनिलकुमार कदम, शर्मिला गोसावी आणि भाग्यश्री कुलकर्णी या माझ्या सहकाऱ्यांनीही हे पुस्तक वाचकांसमोर यावं म्हणून खूप मोलाची मदत अगदी आनंदाने केली आहे.
माझ्या आयुष्यात आलेल्या आणि या प्रवासात भेटलेल्या अनेकांचा उल्लेख पुस्तकात त्या त्या प्रसंगानुसार आलेला आहेच. पण तरीही काहींचा उल्लेख विस्थारभयास्तव करता आलेला नसला तरी त्याचं माझ्या मनातलं आणि जीवनातलं स्थान अबाधित आहे याची मी ग्वाही देतो. पण काहींचा उल्लेख मात्र मला इथे केलाच पाहिजे. त्यात जयश्री आणि भारती या माझ्या बहिणी, जुळा भाऊ डॉ. दिलीप, माझ्या पाठिशी खंबीरपणे उभी राहाणारी सहचारिणी रोहिणी, माझी प्रेरणा बनून माझ्या आयुष्यात आलेले अमेय आणि अथर्व ही मुलं आणि सून सुजल या माझ्या जीवलगांचा समावेश आहे. कुटुंबातील जिवाभावाचे सदस्य म्हणून या प्रत्येकांनी माझ्या आयुष्यावर कळत न कळत काहीतरी परिणाम केलेला आहे. आणि मला खात्री आहे की मीही त्यांच्या आयुष्यावर असाच काहीसा परिणाम केला आहेच. तेव्हा या सर्वांच्या उल्लेखाशिवाय माझं हे अनुभवविश्व परिपूर्ण होणार नाही.
हे पुस्तकं अत्यंत समाधानी मनोवृत्तीने मी आपल्यासमोर ठेवतो आहे. पुस्तक वाचताना ते आपल्याला जाणवेल आणि पसंतही पडेल अशी आशा आहे.
- दिपक म्हैसेकर
IAS (Retd.)